Monday, 23 May 2016

तीन तेरा

तीन तेरा

'बस्स. हे शेवटचं डिझाईन झालं कि संपलं .' अजय स्वतःशीच बोलत होता. आज शुक्रवार असल्यामुळे त्याला काम आजच संपवायचं  होतं. उगाच विकएंडला मानगुटीवर कामाचं भूत कशाला?
ट्रिंग ट्रिंगतेवढ्यात डेस्कवरचा फोन खणखणला.
"आता कोण तडमडलं?" तो पुटपुटला.
"हॅलो. . मिस्टर अजय जागुष्टे आहेत का?"
"बोलतोय. आपण ? "
"मी श्वेता. विशालची बायको." समोरून उत्तर आलं.
"अं . . बोला ना. काय काम आहे? " कॉल अनपेक्षित होता.
"मला विशालने तुमच्याकडून आमचं मॅरेज सर्टिफिकेट घ्यायला सांगितलंय. आज जमेल का भेटायला ?"
"अच्छा अच्छाचार पाच महिन्यांपूर्वी विशाल म्हणाला होता मला. पण त्यानंतर त्याचाही फोन नाही आला आणि तुम्हीही नाही आलात. ठीकाय. जमेल मला आज. कुठे भेटायचं?"
"तुम्ही सांगा" ती म्हणाली.
"एक काम करा. स्टेशन जवळ 'शिवप्रसाद' आहेना तिथे भेटा. माझं घर जवळच आहे तिथून. मी सर्टिफिकेट घेऊन सात सव्वासात पर्यंत येईन. जमेल तुम्हाला? "
"हो. जमेल. थॅंक यु हां"
काम आटपून त्याने स्टेशनला जायला रिक्षा पकडली.  वाऱ्याबरोबर त्याच्या मनात आठवणी घोंघावू लागल्या .  


विशाल. . अजयचा मित्र. एकदम मस्त व्यक्तिमत्व. व्यायामाने कमावलेलं शरीर, उंच बांधा आणि बोलायला  स्मार्ट. दोघंही एकाच कंपनीत काम करायचे. विशाल मार्केटिंग एक्झिक्युटिव तर अजय डिझाईन मॅनेजर. दोघंही लंचला एकत्रच बसायचे. असंच एकदा लंच टाईमला विशालने त्याची लव्हस्टोरी सांगितली होती अजयला. त्याची आणि श्वेताची लव्हस्टोरी!! श्वेता  एक अनाथ मुलगी. मुंबईतल्या अनाथाश्रमात वाढलेली. एकदम स्वाभिमानी. शिक्षण पूर्ण करून नोकरीला लागल्यावर तिने भाड्याने घर घेतले तिकडे राहू लागली. हे घर विशालच्या घराजवळच होतं. तिथेच त्यांच्या प्रेमाचा अंकुर रुजला.
एकदा विशाल जरा उशिरा ऑफिसला आला. आपल्या हातातील कागद पुढं करत अजयला म्हणाला "हे बघ."
अजय आश्चर्याने उडालाच. "मॅरेज सर्टिफिकेट!!"
"येस्स.. आम्ही लग्न केलं रजिस्टर पद्धतीने." इति विशाल.
"अरे पण एवढं घाईत? आम्हाला सांगितलं पण नाहीस"
"आमच्या घरातले कसे आहेत माहितीयेना. ते मुळीच परवानगी देणार नाहीत या लग्नाला. म्हणून  . . "
"म्हणजे तुझ्या घरच्यांनाही माहित नाहीये. अरे देवा." अजय म्हणाला.
"सांगितलं असतं  तर त्यांनी मला लग्नच करू नसतं दिलं. मला emotionally blackmail केलं असतं. आता मात्र लग्न झालंय. लवकरच सांगू त्यांना. तो पर्यंत ती तिच्याच घरी राहणार आहे. फक्त एक काम कर माझं. हे सर्टिफिकेट तुझ्याकडे ठेव. जर घरी ठेवलं आणि कोणी बघितलं तर काही खरं नाही."
अजय ते सर्टिफिकेट ठेवत म्हणाला " ठीकाय. पण लवकर सांग घरी "
महिन्याभराने विशालने घरी सांगितलं आणि महाभारत घडलं. एक तर प्रेमविवाह, तोही रजिस्टर पद्धतीने आणि तो एका अनाथ मुलीबरोबर म्हणजे हुंडाबिंडा घेता. त्याच्या आईने तर आकांडतांडव केलं. श्वेताला तर घरातच घेतलं नाही. शेवटी एक दिवस संधी साधून दोघं पळून गेले. आईवडिलांचा नाही तर देवाचा तरी आशीर्वाद मिळावा म्हणून मग गणपती मंदिरात दोन-चार मित्रांच्या आणि ब्राह्मणांच्या साक्षीने त्यांनी पुन्हा लग्न केलं  आणि संसार मांडलाइकडे विशालच्या आईवडिलांची परिस्थिती फार वाईट झाली होती. एकुलता एक मुलगा घर सोडून गेल्याने  मानसिक त्रास तर होत होताच पण आर्थिक चणचणसुद्धा भासत होती. शेवटी त्यांनी माघार घेतली. आतापर्यंत सर्व झालेल्या चुकांची भरपाई म्हणून कि काय पण दोघांना घरी आणून पुन्हा एकदा थाटात त्यांचं लग्न लावून दिलं. अशा पद्धतीने या दोघांची तीन चार महिन्यांमध्ये तीन लग्ने झाली आणि त्यांच्या संसाराची गाडी रुळावर आली. थोड्याच दिवसात विशालला दुसरी चांगली नोकरी मिळाली. या सर्व गडबडीत ते सर्टिफिकेट अजयकडेच  राहून गेलं होतं. विचार करताकरता अजयची रिक्षा स्टेशनला पोचली.



अजय हॉटेल मध्ये पोचला. ती समोरच्याच खिडकीजवळ बसली होती. अजयला पाहताच हसली.
"सॉरी. थोडा उशीर झाला मला" अजय टेबलाजवळ येत म्हणाला.
"नाही नाही. ठीक आहे" ती.
अजय समोर बसला. तिच्या नजरेतली पूर्वीची चमक थोडी कमी झाल्यासारखी वाटली त्याला. डोळे खूप खोल गेले होते. खूप थकलेली वाटत होती ती.
अजयने दोन कॉफी ऑर्डर केल्या. "जवळ जवळ आठ महिन्यांनी भेटतोय आपण. कसं चाललंय. विशाल कसाय? अलीकडे फोनच करत नाही तो?"
ती कसबसं हसली अन म्हणाली "मजेत चाललंय. अलीकडे खूप उशीर होतो ऑफिसमधून यायला विशालला. म्हणून नसेल केला फोन. तुम्ही सर्टिफिकेट आणलं का?"
"हो. एक मिनिट हं ." अजयने पिशवीतून सर्टिफिकेट काढले. "हां . हे घ्या "
पर्समध्ये सर्टिफिकेट ठेवताना इतकावेळ ओढणी खाली लपलेल्या हातांवरच्या जखमा अजयच्या तीक्ष्ण नजरेतून सुटू शकल्या नाहीत.
"काय झालंय? काही प्रोब्लेम आहे का ?  " अजयने  विचारले
" काही नाही"
अजय प्रेमळ स्वरात म्हणाला " हे बघा. तुम्ही मला बहिणीसारख्या आहात. मला वाटतंय कि काहीतरी प्रॉब्लेम आहे. मला सांगितलं तर मी नक्की मदत करीन. विश्वास ठेवा"
आणि इतका वेळ मनावर घातलेला तिचा बांध फुटला. "काय सांगू तुम्हाला. संपलंय हो सगळं" तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.
"अहो अश्या धीर गमावू नका. काय झालंय? नीट  सांगा पाहू"
श्वेताने हुंदके आवरत म्हणाली "लग्नानंतर आम्ही विशालच्या आईबाबांबरोबर रहायला लागलो. एक-दोन महिने छान गेले. आपण खूप बदललोय असं दाखवून विशालच्या आईबाबांनी विशालचं मन जिंकलं. पण हळूहळू आईंनी विशालचे कान भरायला सुरुवात केली."
"म्हणजे?"
"आईंनी विशालला माझ्या नकळत सांगितलं  कि मी त्यांना त्रास देते, वेळेवर जेवायला देत नाही, चुकीची औषधे देते, उलटं  बोलते आणि बरंच काही. पण खरं सांगते हो, मी असं काहीच केलं नाहीये. मी आईंना समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण त्यांना हुंडा देणारीच सून हवी होती. त्यामुळे विशालच्या मनात त्यांनी माझ्याविषयी एवढं विष कालवलय  कि तो माझ्याशी धड बोलतही नाही. काल तर त्याने माझ्यावर हात " श्वेता अचानक गप्प झाली.
"काय बोलताय काय तुम्ही वहिनी?"
"अहो विशालला एक-एक गोष्टी खोट्या पुराव्यांसकट दाखवल्या आहेत आईंनी. आणि विशालनेसुद्धा माझ्यावर विश्वास नाही ठेवला. आता तर घरात घटस्फोटाचे विषय चालू झालेत"
"वहिनी. तुम्ही काही काळजी करू नका. मी बोलेन त्याच्याशी. पण मला सांगा तुम्ही या सर्टिफिकेटचं काय करणार आहात? काय ठरवलंय तुम्ही"        
काही माहित नाही. ठरवलं  नाहीये. पण फार सहन नाही करणार आता. कदाचित पोलिसांकडे जाईन. कदाचित वकिलाकडे. पण त्यासाठी हे सर्टिफिकेट लागेल म्हणून तुम्हाला भेटायला आले"
"वहिनी. घाई करू नका. एक दोन दिवस वाट बघा. मी उद्याच बोलतो त्याच्याशी."
"ठीक आहे. बघा जमतंय तर. चला निघते मी. उशीर झालाय. घरी जायच्या आधी मला जिमखान्यात थोडं काम आहे. "
अजय घरी परतला. रात्रभर अजयचा डोळ्याला डोळा लागला नाही. हे सर्व त्याच्या कल्पने पलीकडचं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळीच त्याने विशालला फोन लावला.
"हॅलो. विशाल, मी अजय "
"हाय अजय. वेळेवर फोन केलास. अरे श्वेता काल बाहेर गेली ती अजून परत आली नाहीये" विशाल टेन्शनमध्ये म्हणाला.
"काय? अरे ती तर.. कुठे आहेस तू ? डोंबिवली स्टेशनला ये. आपण बघू या" अजय तातडीने डोंबिवलीला निघाला. काय झाले असेल? काही अपघात तर ? कि जीवाचं बरं वाईट तर . . अजयचा मेंदू विचाराने पोखरून निघाला.
दोघं भेटले. "अरे काल पासून ती घरी आली नाहीरे. सगळे काळजीत आहेत" विशाल म्हणाला
अजय " हे बघ धीर धर. ती मला काल भेटली होती."
"काय?" विशाल चमकलाच.
"हो. तिने मला सर्व सांगितलंय. एक काम करूया आधी जिमखान्यात जाऊया. निघताना ती म्हणाली होती कि ती जिमखान्यात जाणार आहे म्हणून"
दोघेही तडक जिमखान्यात गेले. चौकशी केल्यावर समजलं कि ती तिथे आली होती आणि लॉकर उघडला होता. डुप्लीकेट चावीने मॅनेजरने लॉकरचा दरवाजा उघडला.
त्यात एक पत्र होतं. विशालने घाईघाईत पत्र घेतलं.  भराभरा वाचलं. त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. पत्र अजयच्या हातात देत विशाल मटकन कोसळला. पत्रात लिहिलं होतं



"प्रिय विशाल,
मी जातेय. तुझ्या आयुष्यातून खूप दूर.. कायमची.. गेल्या तेरा महिन्यात आपण तीन लग्ने केली पण तरीही आपण एकरूप होऊ शकलो नाही. आज ना उद्या आपला घटस्फोट होणारच होता. पण त्यात माझं  नुकसान होतं. मला आयुष्यभर तुझी घटस्फोटिता म्हणून राहावं लागलं असतं. माझ्यावर विश्वास न ठेवणाऱ्या, माझ्या भावनांना न समजणाऱ्या माणसाची घटस्फोटिता म्हणून मला रहायचं नव्हतं. 
म्हणून मी ठरवलं आपल्या लग्नाचे सर्व पुरावे नष्ट करायचे. मग मी लग्नाचा अल्बम, मॅरेज सर्टिफिकेट सर्व काही नष्ट केले. यापुढे आयुष्यभर मी  अविवाहिता रहायचं ठरवलंय. सर्व आठवणी मनातून पुसून टाकणार आहे मी. आज पासून मी नव्या आयुष्याला सुरुवात करतेय. कृपया मला शोधू नकोस.
कधीच तुझी नसलेली,


श्वेता "                

No comments:

Post a Comment