Tuesday, 20 December 2016

शाळेनंतरचे माझे पहिले वहिले भाषण!!

सर्व माननीय शिक्षक, संस्थेचे अधिकारी, शिक्षकेतर कर्मचारी यांना मनःपूर्वक नमस्कार ! आज इथे येताना खूप आनंद झालाय मला. कारण हा माझ्या आयुष्यातला दुसरा सेंड ऑफ आहे. जवळपास बावीस वर्षांपूर्वी म्हणजे १७ फेब्रुवारी १९९४ ला माझा सेंड ऑफ झाला होता. इतकी वर्षे होऊन गेली पण अजूनही मला तो दिवस आठवतोय. अगदी काळ परवाची गोष्ट असल्यासारखा. कारण तो दिवसच स्पेशल असतो. मनात असंख्य भावना दाटून आलेल्या असतात. थोडं परीक्षेचं टेन्शन असतं. थोडी कॉलेज लाईफची उत्सुकता! तर थोडं दुःखही असतं. आपली शाळा, आपले शिक्षक मित्रमैत्रिणींपासून दुरावण्याचं. आयुष्यातला एक अध्याय संपत असतो आणि नव्याची चाहूल लागत असते.

आयुष्य!! एखाद्या चित्राप्रमाणे असतं हे आयुष्य! आपण चित्र काढायला घेतो. एका कोऱ्या कागदावर पेन्सिलने चित्र रेखाटतो. उभ्या आडव्या वक्र अशा वेगवेगळ्या रेषांनी एक सुंदर चित्र बनते. आणि चित्र रेखाटल्यावर त्यात रंग भरायला सुरुवात करतो. रंग भरताना त्या रेषांनी बनवलेल्या चौकटींचे भान ठेवावं लागतं. रंग कोणतेही असू द्या, शेडींग कसंही करा पण त्या रेषांमध्ये जर रंग सिमित केले नाही तर त्या चित्राची शोभाच निघून जाते. तसंच आयुष्याचं  आहे. आपण शाळेत जातो तेव्हा आपल्या मनाचा कॅनव्हास असाच कोरा असतो. त्यावर आपले शिक्षक आपला हात धरून ज्ञानाचे, संस्कारांचे चित्र रेखाटतात. अन शालेय शिक्षण जेव्हा पूर्ण होते तेव्हा ते चित्र रेखाटून झालेले असते. त्या नंतरच्या आयुष्यात आपण आपल्या आवडीप्रमाणे त्यात रंग भरत जातो. रंग भरताना आपण जर त्या रेघांचे, संस्कारांचे भान ठेवले तर आपलं आयुष्य एका सुंदर कलाकृतीप्रमाणे बहरून येते. तेव्हा आयुष्यात पुढे जे काही कराल त्यात या रेघांचे भान नेहमी लक्षात असू द्या तर तुम्ही नक्की यशस्वी व्हाल.

यशस्वी कोणाला नसतं  व्हायचं? प्रत्येकजण म्हणत असतो मला हे व्हायचंय.. मला ते व्हायचंय. आणि म्हणूनच मी आज तुम्हाला यशस्वी होण्याचा फॉर्म्युला सांगणार आहे. तो फॉर्म्युला  आहे 

C x C x D = Success

तुम्ही म्हणाल आता हे काय आहे नवीनच? सांगतो.
पहिला C म्हणजे Concentration!! एकाग्रता !!
यशस्वी होण्यासाठी सर्वात महत्वाचं असतं  ते ध्येय आणि त्यावर असलेली एकाग्रता. तुम्ही नववीत शिकलाच आहात कि सुरीने जर आपल्याला नीट कापायचं असेल तर तिला नीट धार असली पाहिजे. खिळा जर टोकदार असेल तर तो भिंतीत सहज घुसतो अन जर टोक नसेल तर तो वाकतो, तुटतो. तसेच जर आपण कापूस सूर्यप्रकाशाखाली धरला तर त्याला काही होत नाही पण जर मध्ये भिंग धरले तर प्रकाशकिरण एकत्रित होऊन कापूस जळून जातो. हे सगळे कशामुळे घडते? तर त्या त्या शक्तींच्या एकाग्रतेमुळे!! तशीच एकाग्रता आपल्याला स्वतःमध्ये निर्माण केली पाहिजे. जर आपण आपली इच्छाशक्ती, आपले प्रयत्न त्या खिळ्यासारखे तीक्ष्ण केले तर यशाची पहिली पायरी आपण चढू शकतो.

आता दुसरी पायरी काय आहे ते बघूया. दुसरा C म्हणजे Confidence!! आत्मविश्वास!! मघापासून मी तुमची भाषणं,  तुमची मनोगतं ऐकली. तुमचा सर्वांसमोर बोलतानाचा आत्मविश्वास खूपच उत्कृष्ठ आहे. तसाच आत्मविश्वास आपल्या ध्येयाच्या बाबतीत ठेवायचा. तर आत्मविश्वास कसा कमवायचा? आत्मविश्वास हा brain programming पासून बनतो. कसा? त्यासाठी आपण आधी विश्वास म्हणजे काय ते बघू. आपल्याला डॉक्टरवर 'ते आपल्याला बरं करतील' असा विश्वास असतो. शिक्षक आपल्याला चांगलंच शिकवतात याची आपल्याला खात्री असते तसेच पेपरमधील बातमी आपल्याला whatsapp वरील बातमीपेक्षा विश्वसनीय वाटते. का बरं? कारण आपलं Brain programming तसं घडलंय. किंवा घडवलंय म्हणा ना.  
ब्रेन प्रोग्रॅमिंग समजण्यासाठी एक गोष्ट सांगतो तुम्हाला. एक सर्कसवाला जंगलातून एक हत्तीचं पिल्लू पकडून आणतो. त्याला एका जाडजूड साखळीने पायाला बांधून ठेवतो. साहजिकच ते पिल्लू सुटायचा खूप प्रयत्न करते. पाय ओढून ओढून साखळी तोडायचा प्रयत्न करते. दोन दिवस जातात. चार दिवस जातात. त्याच्या पायातून रक्त येऊ लागते पण साखळी काही केल्या तुटत नाही. हळूहळू ते पिल्लू प्रयत्न सोडून देते. कालांतराने तो हत्ती मोठा होतो. आता मालक त्याला फक्त जाड रश्शीने बांधून ठेवत असतो. आता तो हत्ती ती रश्शी एका फटक्यात तोडू शकतो एवढी ताकद त्यात आलेली असते. पण तो तसं  करत नाही. कारण negative brain programming!! त्याला असं वाटत असतं  कि तो कधीच सुटू शकत नाही. आपलंही तसंच आहे. बरेचदा आपण असंच negative brain programming करून घेतो. 'हा विषय मला येत नाही' 'मला हे जमत नाही ते जमत नाही' 'गणित येत नाही' 'भाषण येत नाही' हि सर्व negative brain programming ची उदाहरणं. त्यामुळेच आपला आत्मविश्वास डळमळतो. म्हणून आपण आपल्या मनाला positive विचार करायला शिकवलं पाहिजे. नकारार्थी विचार काढून टाकले पाहिजेत. जे येत नाही ते परत परत करून बघितले पाहिजे. त्यापासून पळून काय फायदा? काय होईल जास्तीत जास्त? दोन चार वेळा आपण चुकू. पण शेवटी यश नक्कीच मिळेल एकदा हे जमले कि आपला आत्मविश्वास द्विगुणित होईल यात शंका नाही.


आता तिसरी पायरी. D फॉर Determination!! जिद्द !! अजून एक गोष्ट सांगतो. अगदी खरीखुरी. एक माणूस होता. त्याचं नाव जीन डोमिनिक बॉबी. एकदा त्याला stroke /पक्षाघात झाला आणि तो कोमात गेला. वीस दिवसांनी जेव्हा तो शुद्धीवर आला तेव्हा तो पूर्ण paralyse झाला होता. त्याचे हात पाय तो हलवू शकत नव्हता, उठू शकत नव्हता, बोलू शकत नव्हता. तो त्याच्या शरीराची फक्त डाव्या डोळ्याच्या उघडझाप करू शकत होता. आता मला सांगा. असा माणूस काही करू शकेल का? पण त्याने हार मानली नाही. त्याच्या डोक्यात प्रचंड विचार चालू होते. पण तो कोणाला सांगूही शकत नव्हता आणि लिहूही शकत नव्हता. मग त्याने एक विलक्षण सुरुवात केली. त्याने त्याच्या असिस्टंट सोबत संवाद सुरु केला. कसा ? त्याची असिस्टंट त्याला सर्व मुळाक्षरे सांगायची. त्यातलं योग्य अक्षर आलं कि तो डाव्या डोळ्याची पापणी मिटायचा. मग पुढचं अक्षर!! परत ती सर्व मुळाक्षरे सांगायची. असं करत करत अक्षरांमागून अक्षर सांगून शब्द बनले. शब्दांची वाक्ये बनली. आणि हळूहळू त्या माणसाने चक्क अख्ख पुस्तकच लिहिलं!! त्या पुस्तकाचं नाव "The Diving Bell and the Butterfly". जेव्हा ते पुस्तक बाजारात आलं तेव्हा त्याच्या हजारो लाखो प्रति विकल्या गेल्या. याला म्हणतात जिद्द!! जर एक असा माणूस, ज्याला काहीही करणे अशक्य आहे, तो चक्क पुस्तक लिहू शकतो तर विचार करा, जिद्द बाळगल्यास तुम्ही काय काय करू शकाल? बस्स फक्त हि त्रिसूत्री लक्षात ठेवा. Concentration! confidence! and Determination! हि दहावीचं काय पण आयुष्यातील कोणत्याही परीक्षेत तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल. तुम्हाला त्यासाठी माझ्याकडून Best of Luck!!